पनवेल दि.15: पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा अर्थसंकल्प आज आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांच्याकडे सादर केला. 772 कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असल्याचे सांगितले.
1 ऑक्टोबर 2016 ला स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिका पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे. महापालिकेने 2020-2021 मध्ये शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहे तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सुचविण्यात आली नाही.
पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने या अंदाजपत्रकात घेतले आहेत. याचबरोबर पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे, चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकामे करणे, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणाऱ्या उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा यांची विकास कामे हाती घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 52 शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर इमारती दुरूस्ती, बांधकाम, यांच्यावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिला –बालकल्याण विभागाच्या विविध योजनांसाठीचे निश्चित धोरण आखण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानूसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे.
महापालिकेची प्रशासकिय इमारत,स्वराज्य, या मुख्यालयाचा विकास, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग या प्रभाग कार्यालयांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पामध्ये 28 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यासाठी नियमानूसार भरीव तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. तसेच वेटलँड, मॅन्ग्रुव्हस जमिनीचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. सिडकोकडून हस्तांतरीत करण्यात आलेली उद्याने आणि खेळांचे मैदाने यांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे.