अलिबाग दि.22: कोकणातील निसर्गसंपन्न साधन सामुग्रीचा वापर करून तरूणांनी शेती व्यवसायाकडे वळावे आणि गाव सोडून न जाता आपल्याच गावातच शेतीचा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने शासन आणि उद्योजक यांचेमार्फत विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर काजू कलमे वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी तरुणांनो स्वाभिमानाने सांगा मी शेती करतो असे सांगितले. कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि तेल व नैसर्गिक वायू कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना काजू कलमे वाटपाचा शुभारंभ व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी मार्फत डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांचे शुभहस्ते व श्री. नरेंद्र असीजा, ईडी प्लांट मॅनेजर आणि श्री. जॉर्ज विल्यम केरकट्टा मॅनेजर एचआर यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी कृषी सहाय्यक श्री. उमेश गाताडी यांनी धडाडीने सहभाग घेऊन शेतीशाळा कार्यक्रम उत्कृष्ठ राबविला म्हणून त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.