पोस्ट ऑफिस 100 टक्के कोअर बँकींग प्रणालीवर उपलब्ध होणार
नवी मुंबई, दि.25: पोस्टाच्या पारंपारिक सेवांच्या सोबत राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व काऊंटर सेवा विविध योजना अशा अनेक सुविधांमुळे आता टपालखात्याचे स्वरुप आधुनिक बँकांसारखे झाले आहे. पोस्टामार्फत चालविल्या जाणाऱ्या योजनांही आता लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेनुसार चालू वर्षात 1 लाख 50 हजार पोस्ट ऑफिस 100 टक्के कोअर बँकींग प्रणालीवर उपलब्ध होतील, असे भारतीय पोस्ट विभागाने कळविले आहे.
बदलत्या काळात पत्रव्यवहार कमी झाल्याने परिवर्तनाची चाहूल लागताच पोस्ट विभागामध्ये अनेक बदल झालेले आहेत. आसाच एक आधुनिक बदल म्हणून चालू वर्षात 1 लाख 50 हजार पोस्ट ऑफिस 100 टक्के कोअर बँकींग प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधेमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने करणे शक्य होईल. या सेवेमुळे नागरिकांना नेट बँकींग, मोबाईल बँकींग, एटीएमद्वारे खात्यांमध्ये व्यवहार करणे शक्य होणार आहे. तसेच पोस्ट ऑफिस खाती आणि बँक खाती यांच्यामध्ये आर्थिक निधीचे ऑनलाईन हस्तांतरण त्वरीत करणे शक्य होईल. या सुविधेमुळे पोस्टाद्वारे विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी “कार्य करण्याची क्षमता आणि आर्थिक समावेशन सुविधा” उपलब्ध होईल. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे वाशी नवी मुंबई पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.