अलिबाग,दि.9: उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे 100 खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय तसेच डॉक्टर,कर्मचारी यांच्यासाठी निवासी इमारत बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान पवार यांनी सकारात्मक मत मांडले. या रुग्णालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक प्राथमिक निधी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
या बैठकीसाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार मनोहर भोईर, अपर मुख्य सचिव नियोजन  देबाशिष चक्रबर्ती, प्रधान सचिव वित्त  देवरा, सिडकोचे महाव्यवस्थापक संजय मुखर्जी, आरोग्य सेवा अभियान संचालक श्रीमती अस्मिता तायडे, जिल्हाधिकारी रायगड निधी चौधरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप सचिव व प्रशांत पाटील उपस्थित होते.
उरण हा देशातील सर्वांत जास्त शासकीय व खाजगी प्रकल्प स्थापित झालेला तालुका आहे. या भागातील स्थानिकांनी वेळोवेळी शासनास या शासकीय उपक्रम व प्रकल्पांसाठी सहकार्य केलेले आहे. या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा स्थानिकांना मिळण्याबाबत शासनामार्फत येथे असलेल्या सीडको,जेएनपीटी, एचओसीएल आदी प्रकल्पांनी कंपनी सामाजिक उत्तरदायित्वाचे जबाबदारीच्या भावनेने उपजिल्हा रुग्णालय स्थापन होणे गरजेचे आहे,असे मत यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी मांडले.
प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी  सिडकोमार्फत भूखंड मंजूर केला. रुग्णालय बांधकाम सिडकोमार्फत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत विभागाने पुढील कार्यवाही करावी, असे यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्राथमिक खर्च हा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्याबाबत प्रस्ताव दिला जाईल. पुढील बांधकाम या भागातील सिडको,जेएनपीटी व ओएनजी या शासकीय उपक्रमांनी कंपनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या निधीतून करण्यात येईल व त्याबाबत विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!