अलिबाग,दि.3 : मा.भारत निवडणूक आयोगाद्वारे ज्या मतदाराने त्याचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे, अशा मतदारांना e-EPIC डाऊनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता ॲपद्वारा उपलब्ध करून दिली आहे.
यानुसार दि.01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत एकूण प्राप्त मतदारांनी त्यांचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे. यापैकी ज्या मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेतलेले नाही, अशा सर्व मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याकरिता आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना करण्याबाबत आयोगाचे निर्देश आहेत.
यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर व तहसिल कार्यालयात शनिवार, दि. 6 मार्च 2021 व रविवार, दि.7 मार्च 2021 या दोन दिवशी e-EPIC डाऊनलोड करण्याबाबत विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी आपला एकल (Unique) मोबाईल नंबर नोंदविलेला आहे, अशा मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधून e-EPIC डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.