पनवेल दि.२९: कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयाचा शतकपूर्ती सोहळा आज मोठ्या दिमाखात दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सकाळी साडेदहा वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार,शाळेचे माजी विद्यार्थी तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, माजी राज्य मंत्री मिनाक्षीताई पाटील, खा. सुनील तटकरे, मा. आमदार विवेक पाटील,माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, प न पा चे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शाळेचे चेअरमन तथा कोकण शिक्षक मतदार संघांचे आमदार बाळाराम पाटील आदी दिग्गज नेत्यांसह सर्व पालिका नगरसेवक, माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्व. आत्माराम महादेव आटवणे यांनी शाळेला दिलेली अडीच एकर जागा आणि दोन बांधीव इमारती, ज्यामुळे शाळेने आपली १०० वर्षे दिमाखात पार पाडली त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचे अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशुभहस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच यावेळी रंगावली कलाकारांनी साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाचेही उदघाटन करण्यात आले. माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्याहस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले की, एखादी शैक्षणिक संस्था उभारणे आणि ती अविरतपणे चालविणे हे फार मोठे काम आहे आणि सगळ्यात अवघड बाब म्हणजे ती टिकून ठेवणे ही, खरेतर ती तारेवरची कसरत आहे. अनेक शिक्षण संस्थांमधून अनेक कर्तृत्ववान माणसे झाली. यामध्ये प्रामुख्याने कोकण एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा उल्लेख करावाच लागेल. खेड्यापाड्यातील लोकांनी शेती करावी, मत्स्यव्यवसाय करावा मात्र हे सगळं करण्यासाठी सुद्धा शिक्षण महत्वाचे आहे. या शिक्षण संस्थेमध्ये संजय पाटील आणि बाळाराम पाटील यांच्या पूर्वपिढ्यांनी उभी केलेली ही शाळा आहे, या शाळेच्या देखभालीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वच मंडळींसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. यावेळी जे.एम.म्हात्रे, रामशेठ ठाकूर यांनी आपापल्या परीने शिक्षण क्षेत्रात योगदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन विद्यार्थी घडविण्यासाठी,उद्याचे देशाचे भविष्य उभे करण्यासाठी सर्वांनीच योगदान देण्याची गरज आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे स्नेही मनोहर पंत जोशी यांच्यासोबत राजकारणात एकमेकांसमोर उभे असताना डागलेल्या तोफा, यामध्ये सर्व बाबींचा आम्हाला सामना करावा लागत असतानाही आज आम्ही मोठ्या मनाने एकत्र या व्यासपीठावर उपस्थित आहोत. यावेळी शाळेबाबत बोलताना पवार म्हणाले, आत्माराम आटवणे यांनी शाळेला दिलेले योगदान हे नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या नावाने शाळेने स्मृतिस्तंभ उभारून नेक काम केलं आहे.