अलिबाग दि.26 : उच्च शिक्षण मंत्रालयाच्या ग्रामीण शिक्षण विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेने “वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन” हा पुरस्कार नुकताच श्री.डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या महाविद्यालयाला घोषित करण्यात आला आहे.
हा पुरस्कार दि.24 ऑगस्ट 2021 रोजी रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते श्री.डी.डी.विसपुते कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट, नवीन पनवेल या कॉलेजच्या वतीने सचिव संगीता विसपुते व प्राचार्या विद्या मोहोळ यांनी स्विकारला.
उच्च शिक्षण विभाग, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या हरित भारत उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील या महाविद्यालयाने एक मानक स्वच्छता कृती योजनाबध्द रितीने राबवून विद्यार्थी आणि परिसर स्तरावर स्वच्छ आणि हरित परिसर साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. हरित परिसर, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धन या विषयांवर एकत्रित काम करण्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांनी सांघिक अथक प्रयत्न केले.
या पुरस्काराचा मुख्य उद्देश स्वच्छ भारत अभियानाकडे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थांचे फक्त लक्ष वेधणे, हा नव्हता तर कागद, पाणी, ऊर्जा यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर कसा होवू शकतो, याबद्दल जागृती करणे हा होता.
श्री.डी.डी.विसपुते महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी आपले काम वाढविले असून यानुषंगाने त्यांनी पनवेल तालुक्यातील विचुंबे हे गाव दत्तक घेतले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनराज विसपुते यांनी घेतलेला पुढाकार तसेच सचिव संगीता विसपुते, प्राचार्या विद्या मोहोड, SAP चे समन्वयक प्रा.दीपक पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचा यात मोलाचा वाटा आहे.