आमदार प्रशांत ठाकूर यांचा ग्रामस्थांच्या मागणीला पाठींबा
पनवेल दि.१३: मेट्रोच्या सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनला मुर्बी गाव स्टेशन हे नाव देण्याच्या मागणीसाठी मुर्बी ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला पाठींबा देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन आज दिले आहे. सिडकोने मुर्बी गाव नजीक मेट्रो स्टेशनला सेंट्रल पार्क स्टेशन असे नाव दिले आहे. सिडकोच्या या नामकरणाला मुर्बी ग्रामस्थांचा विरोध असून आपल्या गावाची अस्मीता जपण्यासाठी तसेच या स्टेशनला मुर्बी गाव स्टेशन असे नाव देण्याच्या मागणीसाठी मुर्बी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत ग्रामस्थांच्या या मागणीला पाठींबा दिला. यावेळी ते म्हणाले की, मुर्बी ग्रामस्थांनी केले हे लाक्षणिक उपोषण हे गावाची अस्मिता जपण्यासाठी केले असून त्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, किरण पाटील, नवी मुंबई 95 गाव आणि नैना प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अॅडव्होकट सुरेश ठाकूर, रमेश खेडकर यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.