पनवेल दि.3: सामाजिक बांधिलकी जपत नि:स्वार्थ भावनेतून केलेली मदत सामाजिक संस्थांसाठी मोलाची असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी पनवेल येथे  केले.
    पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघातर्फे शासनाचे अनुदान मिळत नसलेल्या पनवेल जवळील सत्कर्म श्रद्धाश्रय व अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्ट या समाजसेवी संस्थांना प्रमुख पाहुणे  गणेश कोळी यांच्या हस्ते निधी वितरीत करण्यात आले,या संस्थांना ग्राहक संघातर्फे प्रत्येकी 40,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
   या कार्यक्रमास गीतांजली ग्राहक संघ पनवेलचे संघप्रमुख रमेश एरंडे, डॉ. समिधा गांधी,सुहास सहस्रबुद्धे, सत्कर्म श्रद्धाश्रयचे मोहन बापट, वात्सल्य ट्रस्टच्या गीता वैशंपायन उपस्थित होत्या.
   यापुढे बोलताना गणेश कोळी यांनी, समाजामध्ये अशा अनेक संस्था आहेत ,ज्यांना मदतीचा हात आपण दिला तर ती मदत मोलाची होते. गीतांजली ग्राहक संघाचा हा समाजसेवी संस्थांना मदतीचा उपक्रम समाजातील इतरांना प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था या समाजाच्या मदतीने आपली वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
   वात्सल्य ट्रस्टच्या गीता वैशंपायन यांनी बोलताना, समाजामध्ये वृद्धाश्रम- अनाथाश्रम असणे हे काही भूषणावह नाही.यासाठी सामाजिक जागृती होणे गरजेचे असून जन्माला आलेल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, या भावनेतून आमच ट्रस्ट काम करत आहे. पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाने केलेली आर्थिक मदत ही वेगळीच मदत आहे. समाजाच्या मदतीचा समाजासाठी कार्य करीत असलेल्या संस्थांना मोठा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास सहस्त्रबुद्धे यांनी केले , त्यांनी गीतांजली ग्राहक संघ पनवेल हा गेली तीस वर्षे कार्यरत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक मदत केली आहे. बीड येथील शांतीवन, वसई येथील अनाथ मुलांसाठी काम करणारी साई आधार संस्था, माणगाव येथील वृद्धाश्रम, पेण येथील आई डे-केअर संस्था, नवीन पनवेल येथील बालग्राम अशा आणखी विविध संस्थांना मदत केली असल्याचे सांगितले.
    यावेळी सत्कर्म श्रद्धाश्रय मोहन बापट,ग्राहक संघाचे विजय भिडे यांची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार संजय कसबजे यांनी केले तर सूत्रसंचालन अर्चना अनिलकुमार कुलकर्णी यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!