ठाणे दि. १५ : महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यामध्ये सांस्कृतिक आदान प्रदान व एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणं फारसं अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज नवी मुंबईत केले. वाशी येथे उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासी मंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक , मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.