पत्रकारांसह त्यांच्या कुटूंबीयांनीही घेतला लाभ
पनवेल दि. १४: पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष ऍड.मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून ३५० नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरण नवीन पनवेल येथील भुजबळ वाडीतील जि. प. शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी नवीन पनवेल येथील यशोधन सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भागीरथी सोसायटी या तीनही सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबियांचेही लसीकरण करण्यात आले.
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत महत्वाचे आहे. असे असतानाही अनेकजण अजूनही लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. १८ ते ४४ या वयोगटातील अनेक नागरिकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही. अशावेळी सर्वांचे लसीकरण व्हावे या भावनेतून सदरचे लसीकरण सत्र आयोजित केले असल्याचे ऍड.मनोज भुजबळ यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सर्वप्रथम २५० लसी खरेदी करण्याचे ठरवले होते. परंतु त्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या नातेवाईकांचेही लसीकरण करण्याचा विचार मनात आला. पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटलकडून लसी खरेदी करण्यात आल्या असून १८ ते ४४ वयोगटातील ३५० नागरिकांचे लसीकरण लाईफलाईन हॉस्पिटलच्या टीमने केले. प्रभागातील नागरिकांबरोबरच पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनीही या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. काही ठिकाणी पत्रकारांसाठी यापूर्वी लसीकरण मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पत्रकारांच्या कुटुंबियांना लसीकरणाचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील पत्रकार संघटनांशी मनोज भुजबळ यांनी संपर्क साधून पत्रकारांच्या कुटुंबातील साधारण ५० व्यक्तींचे लसीकरण करण्याबाबत आवाहन केले होते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सदरची लसीकरण मोहीम आयोजित केली असल्याचे ऍड.मनोज भुजबळ यांनी सांगितले.
या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पनवेल शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनीही ऍड.मनोज भुजबळ यांचे आभार मानले.
सदर लसीकरण मोहीमेसाठी उत्कर्ष मित्र मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!