मुंबई, दि. २८ :- औषधोपचार आणि सुविधा देण्यात महाराष्ट्र कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले.
केवळ आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केलं असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही. त्यामुळे गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा. कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले
मुख्यमंत्र्यांनी १ जुलै रोजी येणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या, तसेच हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असून हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात दिवसरात्र शेतात राबून अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही मी विनम्र नमस्कार करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तक्रारींची गंभीर दखल
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.
कर्जमुक्त करणार
कर्जमुक्तीच्या योजनेची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी निवडणुकीची आचारसंहिता आल्याने आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही, ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील जनतेचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल दर्शनाला जाणार
आपल्यातील एकसंघपणा कायम ठेवताना आतापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांना धन्यवाद देताना म्हटले की सर्वांनी सामाजिक भान ठेऊन शिस्तबद्धरितीने सगळे सण साधेपणाने आणि घरातल्या घरात साजरे केले. सर्वांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असताना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही व त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्यासाठी साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सव रद्द केल्याबद्धल आभार
कोणतीही चर्चा न करता स्वतःहून सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव रद्द करणाऱ्या मंडळांचेही त्यांनी आभार मानले. ते म्हणाले की, सर्वधर्मियांनी आतापर्यंत अतिशय साधेपणाने सण साजरे केले आहेत. कारण आपण हे सामाजिक भान पाळले नाही तर संकटाचे दार आपोआप उघडणार आहे. त्यामुळे हे सामाजिक भान आपल्याला जपावेच लागेल.
गणेश मूर्ती ४ फूट उंचीची
सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सर्व गणेशमंडळांनी एकसुरात सांगितले आहे. मोठ्या २०/ २२ फुट उंचीच्या मूर्ती स्थापित करण्याची आजची परिस्थिती नाही. कारण मूर्ती हलविताना जास्त माणसे लागू शकतात. ते आजच्या परिस्थितीत शक्य नाही. म्हणून ४ फूट उंचीपर्यंतची मूर्ती यावर्षी स्थापित करण्याचे सांगण्यात आले आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. मग उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावर चर्चा करून फक्त परंपरा कशी जपता येईल यादृष्टीने लवकरच निर्णय कळवू असेही ते म्हणाले. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने राज्य कोरोनामुक्त करुया. आपण ठरवलं तर ते नक्की करू शकतो असे सांगताना त्यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यासारखे जनजागृतीचे कार्यक्रम आखून उत्सव साजरा करूया, असे देखील ते म्हणाले.
औषधोपचारात महाराष्ट्र जगाच्या बरोबरीने उभा; प्लाझ्मा दान करा
कोरोना रुग्णांवरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचे सांगताना जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपला महाराष्ट्र उपचारात जगाबरोबरीने उभा असल्याचे सांगताना ते म्हणाले, प्लाझ्मा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात मार्च – एप्रिलपासून झाली. १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे झाले तर ७ जण घरीही गेले. प्लाझ्मा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडीज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही केले.
रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे आपण वापरतच आहोत. याचा पुरवठा सुरळित झाला की कुठेही तुटवडा पडू देणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय-निमशासकीय रुग्णालयातही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे.
ज्येष्ठ डॉक्टरांना आवाहन
महाराष्ट्राला तुमच्या अनुभवाची गरज असल्याचे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ डॉक्टरांना पुढे येऊन रुग्णसेवा देण्याचे आवाहन केले. आपल्याला आवश्यक असलेली सर्व सुरक्षा साधने पुरवण्यात येतील, अशी ग्वाहीही दिली.
‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये हालचाल वाढली, संपर्क वाढल्याने रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली तरी ‘चेस द व्हायरस’ ही संकल्पना मुंबईप्रमाणे राज्यात सुरु केल्याचे व औषधोपचार, टेस्ट वाढविण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पावसाळ्यात घ्या काळजी
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लिप्टो यासारखे आजार डोके वर काढतात हे लक्षात घेऊन नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छता बाळगून कुठेही पाणी साठू देऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. गर्दी करून कोरोनाला आपणहून निमंत्रण देऊ नका, गाफील राहू नका, असेही ते यावेळी म्हणाले.
गरीब कल्याण योजनेची मुदत ३ महिन्यांनी वाढवा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने ती आणखी ३ महिन्यांसाठी वाढवून देण्याची विनंती आपण पंतप्रधानांसमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास
गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो ही गोष्ट खूप महत्त्वाची असून गेल्या आठवड्यात १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार विविध कंपन्यांसोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच यामध्ये भूमीपुत्रांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
घरातच राहा, सुरक्षित राहा. शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ३० जूनला लॉकडाऊन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरु होणार या भ्रमात न राहण्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे नाहीत. पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही असे नाही, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे, मास्क वापरण्याचे, स्वच्छता पाळण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले.