अलिबाग,दि.6 : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमधील रेवा येथे पाठविण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त्ा कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार अमित सानप आदी उपस्थित होते.
कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मध्यप्रदेश येथील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते. तसे ते रायगड जिल्ह्यातही अडकले होते.
लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरु लागल्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले. तसेच विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून पुढील समन्वयाबाबतचे नियोजन केले.
जिल्ह्यात अडकलेल्या सर्वांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी शासनाने व प्रशासनाने देखील मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय साधला.
रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर/व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, पनवेल तालुक्यातील विविध भागामधून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली तर मध्यप्रदेश शासनाने या मजूर/व्यक्तींचा रेल्वेने जाण्याचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्विकारली. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले आहेत.
रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाईझ करणे व रेल्वे स्थानकावर निर्जंतूकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. प्रवाशांना मास्कचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते, ओढ होती. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे मन:पर्वूक आभार मानले.
