पनवेल दि.20: पनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटविणारे आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकाचे आयुक्त म्हणून कामभार हाती घेतल्यापासून महानगरपालिका हद्दीतील अनेक विकास कामांना गती देण्याचे काम केले असून त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राज्यात उद्भवलेल्या विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व त्याला आळा बसण्यासाठी श्री.गणेश देशमुख हे चांगले प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या संकट काळात महापालिका आयुक्तांची बदली करणे हा पनवेलकरांवर अन्याय असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सद्यस्थिती पहाता पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणाऱ्या श्री.गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पनवेल महानगरपालिकेचा कारभार सोपविण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत समस्त पनवेलकरांची भावना यातून मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!