नवी मुंबई दि.11: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी, सेक्टर 30 ए येथे सिडको एक्झिबिशन सेंटर येथे उभारण्यात येत असलेल्या कोव्हीड 19 विशेष रुग्णालयाचे काम अंतिम स्वरुपात असून येथील सेवांची आज महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एकत्रितरित्या पाहणी केली व समाधान व्यक्त केले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचेकडून रुग्णालयातील विविध सुविधांची माहिती जाणून घेत नागरिकांसाठी ही सुविधा खुली करावी असे त्यांनी निर्देशित केले. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे, शासनाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा व शासनाच्या वडार समाज कल्याण समितीचे अध्यक्ष विजय चौगुले, पोलीस आयुक्त संजय कुमार आणि इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
कोव्हीड 19 रुग्णांच्या उपचारार्थ 1200 खाटांचे हे रुग्णालय 2 महिन्यांच्या कालावधीत तत्परतेने उभारण्यात आले याचा विशेष उल्लेख करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी नॉन ऑक्सिजन बेड्ससह 500 ऑक्सिजन बेड्स तसेच एक्सरे, डायलेसिस, लॅबरोटरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून 50 बेड्चे आयसीयू युनिट उभारण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री महोदयांनी या रुग्णालयाठिकाणी वारंवार भेटी देऊन मौलीक सूचना केल्या होत्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात 60 डॉक्टर्स, 250 नर्स व 350 बहुउद्देशीय कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध अ्सून याठिकाणी आयसीयू युनिट्स उभारण्यासाठी राज्य शासनाचा आरोग्य विभाग सर्वोतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. राज्य शासनामार्फत आवश्यक व्हेन्टिलेटर्सही उपलब्ध करून देण्यात येतील असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 60 टक्के असून याबद्दल समाधान व्यक्त करीत नागरिकांनी अनलॉक 1 मध्ये सोशल डिस्टन्सींगचे पालन करून कोरोनाच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवावे असे आवाहन केले. अशा प्रकारच्या रुग्णालयांमुळे आरोग्य सेवेला अधिक बळ मिळून रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येथील असेही ते म्हणाले.
आजपासून कोव्हीड 19 रुग्णालयात कोरोना बाधीत लक्षणे नसलेल्या व सौम्य स्वरुपाच्या लक्षणे असलेल्या कोरोना बाधीतांना प्रवेश देण्यात आला असून आजच्या दिवशी 10 रुग्णांना दाखल करण्यात आलेले आहे.