अलिबाग दि.20: पूर्वी मुंबईतून चाकरमानी हा गावी आला की गावातील ग्रामस्थ आवर्जून त्याची विचारपूस करीत असत. पण करोनाच्या भीतीमुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गावात घेण्यास हेच गावकरी आता घाबरत आहेत. मात्र याला अपवाद ठरली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत.
या चिमण्यांनो परत फिरा रे… घराकडे आपुल्या, अशी साद या ग्रामपंचायतीने संकटात सापडलेल्या आपल्या चाकरमान्यांना घातली आहे. करोना संकटकाळात चौल गावाने आपल्या माणसांप्रती माणूसकी दाखवित गावात स्वीकारण्याचे औदार्य अन् धैर्य दाखविले आहे. त्यांची ही कृती अन्य गावांनी आदर्श घेण्यासारखी व अनुकरणीय आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये नोकरीधंद्यानिमित्त गेलेले चाकरमानी आता पुन्हा गावात येऊ लागले आहेत. मात्र गावी आल्यानंतर करोना संसर्गाच्या भीतीमुळे त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी सध्या चाकरमानी आणि ग्रामस्थ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र याला अपवाद ठरले आहे ते चौल गाव. नोकरी, व्यवसायानिमित्ताने मुंबई किंवा अन्य ठिकाणी गेलेल्या चाकरमान्यांना गावात यायचे असेल तर त्यांना अडविले जात नाही. गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांची ग्रामपंचायतीमधील करोना नियंत्रण कक्षात नोंद घेतली जाते, त्यानंतर रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जाते आणि हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का मारला जातो. ज्यांना क्वॉरंटाईन करावयाचे आहे त्यांच्यासाठी गावात चौल जिल्हा परिषद केंद्र शाळा, भोवाळे जिल्हा परिषद शाळा, आग्राव जिल्हा परिषद शाळा आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे ज्युनिअर कॉलेज अशा चार ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या क्वॉरंटाईन कक्षातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गावाने उत्तम व्यवस्था केली आहे. या ठिकाणी दिवसा अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांची तर रात्री ग्रामपंचायत पुरुष कर्मचारी, कोतवाल यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून जेवणाचा डबा पोहोचविण्याची देखील व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर भविष्यात नातेवाईक नसलेले कुटूंब जरी गावात आले तरी त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था गावातील खानावळीमार्फत होईल, याची तजवीज करुन ठेवण्यात आली आहे.
10 हजार 155 लोकसंख्या असलेल्या या चौल गावात आतापर्यंत मुंबईतून जवळपास 475 चाकरमानी आले आहेत. त्यांची गावात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांची रोज आरोग्य तपासणी केली जात आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या चाकरमान्यांची गावचे सरपंच,ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन आपुलकीने चौकशी करीत असतात. करोनाच्या संकटकाळात अन्य गावातील नागरिकांनी चाकरमान्यांना विरोध केला असता तरी चौल ग्रामपंचायत आमच्या पाठीशी ठाम उभी राहिल्याने आम्ही गावचे आणि येथील प्रशासनाचेही खूप खूप आभारी आहोत, अशी कृतज्ञतेची भावना या क्वॉरंटाईन कक्षात सध्या असलेल्या रश्मी पाटील, रमेश पाटील, शंकर भोस्तेकर, सुशांत म्हात्रे आणि राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
…आणि गावकरी तयार झाले
चौल जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा संजय पवार,उपसरपंच अजित गुरव, पंचायत समिती सदस्य मयुरी महेंद्र पाटील, ग्रामसेवक श्रीहरी अर्जून खरात, मंडळ अधिकारी मोकल, तलाठी दिवकर, शितल म्हात्रे, ग्रामपंचायत कर्मचारी निलेश गुरव, मनिषा राणे, दिनेश शिंदे, निशांत म्हात्रे, मनोज ठाकूर, आरोग्य सेविका श्रीमती मंगल ठाकूर आणि ग्रामस्थ यांची स्वच्छता, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन, मास्क लावणे, या अशा सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सामूहिक चर्चा केली. करोनाच्या या संकटकाळात आपणच आपल्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे, हे गरजेचे कसे आहे, हे पटवून दिले. गावाला त्यांचे म्हणणे पटले, यानंतर ग्रामस्थांनी एकमुखाने चाकरमान्यांचे स्वागत करण्याचा आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत चौल गावात साडेचारशेहून अधिक चाकरमानी आले आहेत,आणि त्या सर्वांची गावकरी व येथील स्थानिक प्रशासन मिळून व्यवस्थितपणे काळजी घेत आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!