वाढदिवस म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा दिवस… कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी, हितचिंतक यांनी एकत्र जमून हर्षोल्हासात साजरा करण्याचा एक भावबंध कार्यक्रम. वैश्विक महामारी कोरोनामुळे मात्र या परंपरेला छेद गेला आहे, परंतु एरवी जन्मदिन हा जो तो आपल्या परीने साजरा करीत असतो, पण हा दिवस म्हणजे केवळ केक कापणे, शुभेच्छा स्वीकारणे, जल्लोष करणे एवढाच नसतो तर तो त्या व्यक्तीला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतो, सरलेल्या आयुष्यात माणूस म्हणून काय कमावले याचे सिंहावलोकन करण्याचाही असतो. या बाबतीत रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आलेख सदैव चढता आणि तितकाच व्यापक राहिलेला आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन त्यांच्यापुरता मर्यादित न राहता तो एक सोहळा बनतो. माणसाच्या वाटचालीत त्याने बालपणी अनुभवलेल्या परिस्थितीचा फार मोठा प्रभाव असतो किंबहुना यातूनच त्याची जडणघडण होत असते. मातोश्री भागूबाई आणि पिताश्री चांगू ठाकूर यांच्या उत्तम संस्कारांतून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनाचा भक्कम पाया रचला गेला. बेताच्या आर्थिक स्थितीमुळे अपार कष्ट घेण्याची सवय त्यांना बालवयातच लागली, पण म्हणून मोठे झाल्यानंतर सर्वकाही प्राप्त होऊनही ना त्यांनी संस्कार सोडले ना मेहनत. उलट ते जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांनी आपल्या कामाचा आवाका वाढविला आणि आपल्याला जी झळ बसली ती इतरांना बसू नये यासाठी सदैव सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून येते. माणसाच्या जीवनात गुरू फार महत्त्वाचा असतो. अगदी प्रत्येकाचा गुरू नसला तरी कुणी ना कुणी आदर्श असतोच. तशाच प्रकारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनात कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, समाजसुधारक जनार्दन भगत यांचे स्थान मोठे राहिलेले आहे. भगतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली कारकिर्द घडविली, तर सातार्‍याच्या रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर अण्णांच्या शिकवणुकीतून शिक्षण घेत असताना त्यांच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. जीवनाचे सार त्यांना तेथे उमगले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून परतल्यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काही काळ शिक्षक म्हणून अध्ययन केले, पण समाजासाठी काहीतरी करायचे असेल तर नोकरी करून भागणार नाही हे त्यांना कळून चुकले. मग ते व्यवसायात उतरले आणि परिश्रम, सचोटीच्या जोरावर अल्पावधीतच यशस्वी कंत्राटदार म्हणून नावारूपास आले. मग त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आपण जेथे वाढलो, मोठे झालो त्या परिसराचे, समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून शिक्षणप्रेमी रामशेठ ठाकूर यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करून दर्जेदार शाळा-महाविद्यालये उभारली, कारण सर्वसामान्यांचा शिक्षणातून उत्कर्ष होईल हे ते ओळखून होते. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केले. आज हे मंडळ गरीब, गरजूंसाठी आधार बनले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची राजकीय झेप तर सर्वश्रुत आहे, शिवाय कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा वावर असतो. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी पदार्पण केले तेथे त्यांचे कार्य दीपस्तंभ ठरलेले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर स्पष्टवक्ते आहेत, शिवाय कमालीचे शिस्तप्रियही. खोटेपणा त्यांना रूचत नाही आणि कामात हयगय चालत नाही. हाती घेतलेले काम चोखपणे पूर्णत्वास नेण्यासाठी ते स्वत: झोकून देऊन कार्यरत असतात. आजही तरुणाईला लाजवेल अशा पद्धतीने ते काम करीत असल्याचे पहावयास मिळते. हेच त्यांच्या यशाचे गमक असावे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या देशातही सर्व काही ठप्प होऊन अनेकांची परवड होऊ लागली. अशा वेळी दानशूर रामशेठ ठाकूर परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीप्रमाणे देवदूत बनून धावून गेले. त्यांनी हातावर पोट असलेल्या लोकांची उपासमार होऊ नये यासाठी मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र सुरू केले. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. याखेरिज मास्क, सॅनिटायझर, गोळ्या पुरविल्या. यंदाही गोरगरिबांना अन्नधान्याचे मोफत वितरण घरोघरी जाऊन केले जात आहे. वडाचे झाड जसजसे मोठे होत जाते तसा त्याचा विस्तार होत जातो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूरसुद्धा एक भरभक्कम आधारवड आहेत. गेली अनेक वर्षे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मोलाचा आधार मिळत आलेला आहे. अशा या लोकांच्या मनातील लोकनेत्याला ७०व्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!