पनवेल दि.12: महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी उत्तर रायगड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या संदर्भात तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, जिल्हा चिटणीस चारुशीला घरत, उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईर, मृणाल खेडकर, पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, उरण तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष वनिता विजय पाटील, कामोठे अध्यक्षा वनिता दिलीप पाटील, खालापूर तालुकाध्यक्षा सुजाता दळवी, कर्जत तालुकाध्यक्षा सरस्वती चौधरी, महिला व बाल कल्याण सभापती कुसूम म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, सीता पाटील, रुचिता लोंढे, हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेविका निता माळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, समिना साठी, बिना गोगरी, सपना पाटील, सुनिता गुरव, राखी पिंपळे, जयश्री धापटे, रसिका शेटये, सुनिता महर्षी, स्नेहल सावंत, आश्विनी अत्रे, सुरेखा गांधी, अमरीश मोकल, रविंद्र नाईक, अमर उपाध्याय, आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाने प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले. मात्र सदर निवेदनाचे व परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही. भाजपा महिला मोर्चाच्यावतीने दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्रामधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते. रायगड जिल्ह्मामध्येही पनवेल तालुक्यातील दुंदरे गावातील महिलेवर झालेला अत्याचार असो की, कोन इंडिया बुल कोव्हिड विलगीकरण केंद्रात उपचार घेत असलेल्या महिलेवर झालेला अतिप्रसंग तसेच रोहा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार अशा व यासारख्या अनेक घटना रायगड जिल्ह्मातही होत आहेत. परंतु तरीही असंवेदनशील महाविकास आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात वाचा फोडण्यासाठी पुन्हा आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तसेच महाविकास आघाडीच्या असंवेदनशील कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.