अलिबाग,दि.25 : रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असून मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महानगरांच्या नजिक असल्याने दरवर्षी नाताळ व 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात येतात.
    शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडील दि.21 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि.22 डिसेंबर 2020 ते दि.05 जानेवारी 2021 या कालावधीकरिता सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
    या पार्श्वभूमीवर संबधित जिल्हाधिकाऱ्यांना कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या कायक्षेत्रात रात्रीची संचारबंदी मुख्य सचिवांच्या पूर्वपरवानगीने लागू करण्याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे.
       दि.25 डिसेंबर 2020 ते दि.02 जानेवारी 2021 या कालावधीत असलेल्या सुट्टया तसेच शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी विचारात घेता मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या महानगरातून पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागताकरिता जिल्ह्यात दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब तसेच पोलीस अधीक्षक, रायगड यांनी दि.21 डिसेंबर 2020 रोजीच्या पत्रान्वये सादर केलेला प्रस्ताव विचारात घेता, रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने गर्दी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दि.25 डिसेंबर 2020 ते दि.05 जानेवारी 2021 या कालावधीत पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत:-
1) दि.28 डिसेंबर 2020 ते दि.01 जानेवारी 2021 या कालावधीत मांडवा, रेवस, खारपाडा, वडवली टोल नाका, माथेरान, वाकण फाटा, ताम्हाणी घाट, वरंध घाट व छ. शिवाजी महाराज चौक, पोलादपूर अशा 9 ठिकाणी चेक पोस्टची स्थापना करण्यात येणार आहे. या चेकपोस्टवर आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची कोविड-19 च्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी केली जाणार आहे.
2) मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर दि.25 डिसेंबर 2020 ते दि.02 जानेवारी 2021 या कालावधीत पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे.
3) शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत  व पुर्नवसन विभागाकडील दि.21 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या निर्देशानुसार रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दि.25 डिसेंबर 2020 ते दि.05 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
      ही संचारबंदी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक स्थळी, नदी, समुद्रकिनाऱ्यावर लागू राहील, जेणेकरुन नववर्षाच्या आनंदमयी क्षणी दुर्घटना घडू नयेत. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट इत्यादीं मध्ये कोविड अनुषंगिक नियमांचे पालन करुन नववर्ष साजरा करण्यास प्रतिबंध असणार नाही.
      तरी ही संचारबंदी नागरिकांची सुरक्षा, पर्यटकांचे हित आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक असून नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!