ठाणे दि.२५: केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत असून येत्या काही दिवसात ठाणे ते बोरीवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केले. वाहतूक कोंडीतून ठाणे शहराला मुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. निरोगी शहर उभे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे. आपल्या शहरांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्यासपीठ देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. विकासाची ही कामे जनतेच्या पैशातून होत आहेत. त्यामुळे त्यात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्यात स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांसाठी विविध माध्यमातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. त्यामुळे एक श्रद्धास्थान म्हणून आदिवासी बांधव शिंदे यांच्याकडे पाहतात, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. तसेच महापालिकेला मिळालेल्या सुविधा भूखंडावर आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे काम सुरू होत आहे. ३२० मुलींची व्यवस्था तेथे केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या कार्यक्रमात फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे होत आहेत. जी कामे सुरू झाली आहेत त्याचे वास्तव आता डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागले आहे. या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे या कामांची गुणवत्ता ही सर्वोच्च रहावी यासाठी मुख्यमंत्री स्वतः आग्रही आहेत. वारंवार आम्हाला त्याबद्दल सूचना करतात, मार्गदर्शन करतात. केवळ मार्गदर्शन करून थांबत नाहीत तर साईट वर येऊन कामाची गुणवत्ता चांगली आहे का नाही हे पाहतात. त्यामुळे सगळी यंत्रणा सतत दक्ष राहते, असे आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. कासारवडवली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, शिवसेनाप्रमुख हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि डिजिटल अक्वेरियम या दोन वास्तूंचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी केले. तर बाबुराव मारुतीराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर, महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृह यांचे लोकार्पण, आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थिनी वसतिगृह, सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र यांचे भूमिपूजन रिमोटद्वारे काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात केले. या कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ओजस देवतळे, अंजली स्वामी, प्रथमेश जावकर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तिरंदाजपटूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.