पनवेल दि.10: रायगड जिल्हयातील विविध उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलणेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे महत्वपूर्ण सूचनावजा मागणी केली आहे.
या संदर्भात आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सद्यस्थितीत रायगड जिल्हयातील विविध औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या हया सामाजिक सुरक्षतेचे नियम पायदळी तुडवित आहेत. अनेक कंपन्यांमध्ये मास्क न वापरणे, एकत्र जेवण करणे व निकषांपेक्षा (प्रत्येकी तीन फूट) कमी अंतर पाळले जात असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना होत असून कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अनेक कंपन्यांमार्फत त्यांच्या कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांवरती कामावर येण्याची सक्ती केली जात असताना शारिरीक अंतर अथवा सामाजिक सुरक्षेचे निकष पाळले जात नाहीतच मात्र उद्योगामध्ये काम करताना कोरोनाची लागण होवूनही अशा कामगारांच्या उपचारावरती मदत मिळवून देण्याबाबत त्यांना वाऱ्यावरती सोडले जात आहे. या संदर्भात रायगड जिल्हयातील कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार अधिकारी (लेबर ऑफिसर) यांनी सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षितेसाठी कोणती पाऊले उचलण्यात येत आहेत व दक्षता घेण्यात येत आहेत याची माहिती व जबाबदारी घ्यावी. तसेच ज्या कंपन्या अशी काळजी घेण्यास असमर्थ असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे. 
सध्यस्थितीत शासकीय रुग्णालयात क्षमता तुटपुंजी असल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या अनेकांना खाजगी रुग्णालयात एकतर जागा मिळत नाही, ज्यांना मिळते त्यांना प्रचंड खर्च सोसावा लागतो. जर सदर उद्योजकांना त्यांचे उत्पादन घेण्यासाठी कारखाना चालवणे आवश्यक असेल तर त्या उद्योगामधील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या खाजगी हॉस्पिटलच्या खर्चाची जबाबदारी देखील घ्यावी, यासाठी आपणामार्फत योग्य ते निर्देश तातडीने दिले जावेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणीतून अधोरेखित केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!