अलिबाग,दि.30 : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली.
आज दुपारी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते व रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना दिल्या. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे, शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे आदेशही त्यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिले.
