मुंबई, दि.5: तळीये दरडग्रस्तांना ‘विशेष बाब’ म्हणून 600 चौ.फू. क्षेत्रफळाची घरे देण्यात येणार असल्याचा निर्णय आज घेण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील तळीये (ता. महाड) येथे दरड कोसळून दुर्घटनेनंतर म्हाडाने हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याबाबत कालबद्ध कार्यवाही करुन येत्या महाराष्ट्र दिनी या घरांचा ताबा तळीये येथील बाधित कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न म्हाडा करीत आहे, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
कोकणातील राहणीमान, शेती, एकत्र कुटुंब पद्धती व पूर्वी असलेल्या घरांच्या क्षेत्रफळानुसार मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येणारे घराचे क्षेत्रफळ हे अपुरे असल्यामुळे स्थानिकांच्या मागणीनुसार वाढीव क्षेत्र मिळण्याबाबत आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी याबाबत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, गृहनिर्माण विभागचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डीग्गीकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, म्हाडा मुंबई मंडळाचे अधिकारी व सल्लागार तसेच तळीये गावचे सरपंच व ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले की, कोकणात वारंवार येणारी वादळे, पुर, अतिवृष्टी अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये प्रि-फॅबरीकेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात येणारी घरे भविष्यातील सर्व आपतकालीन परिस्थितीत अनुकूल ठरतील. त्यासाठी तळीये गावचे पुनर्वसन म्हाडा करीत असून, या तंत्रज्ञानातून तयार झालेले मॉडेल व्हिलेज म्हणून हे गाव विकसीत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे आभार व्यक्त करतांना म्हणाल्या की, राज्य शासनाने केलेल्या मदतीच्या घोषणेनुसार अत्यंत जलद कार्यवाहीतून या दरडग्रस्त गावचे पुनर्वसन होत आहे. मौजे तळीये मधील दुर्घटना क्षेत्र हे दरडप्रवण क्षेत्रातील गाव नसतांनाही येथे ही दुर्घटना घडली, त्यामुळे या संपूर्ण तळीये गावचे पुनवर्सन व्हावे, असे मत व्यक्त केले. सर्व नागरी सुविधांसह या गावचे पुनर्वसन प्रक्रिया करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही त्या म्हणाल्या.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!