अलिबाग, दि.26 : करोना विरुध्दच्या लढाईत संपूर्ण प्रशासनाने कंबर कसली असताना वैद्यकीय क्षेत्राबरोबरच पोलीस प्रशासनही सर्वांच्या खाद्यांला खांदा लावून अहोरात्र झटत आहे. विशेष म्हणजे करोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतरच्या लढाईत जेवढे महत्व आहे किंबहुना तेवढेच महत्व तो रोग पसरु न देण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे आहे, आणि ती धुरा जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या नेतृत्वाखाली रायगड पोलीस प्रशासनाने समर्थपणे पेलली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्व क्षेत्रात वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात आले. परंतु पोलीस मात्र भर उन्हाळ्यात रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. मग ते एखाद्या गरजूला केलेली मदत असो किंवा नियम मोडणाऱ्याला वचक बसावी, याकरिता केलेली कायद्याची कडक अंमलबजावणी असो, कधी गायनातून केलेली जनजागृती असो अथवा घरोघरी जाऊन केलेली तपासणी असो, प्रत्येक वेळी पोलीस जनतेशी थेट संपर्कात असतात. त्यावेळी नकळत करोना बाधित व्यक्तींशी संपर्क होण्याचा धोका असतो. त्यातून त्याच्या कुटूंबियांनाही संसर्गाची जोखीम असते. त्यात व्यस्त दिनचर्येत सर्वांनाच वैद्यकीय कारणासाठी हॉस्पिटल येथे जाणे शक्य होईलच असे नाही. परंतु पोलिसांनी करोना विरुध्दच्या लढाईत लढत असतानाच आवश्यक ती सर्व काळजी घेऊन स्वत: निरोगी असणेही अत्यावश्यक आहे. पोलिसांची हीच गरज लक्षात घेऊन FIGMD प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे रायगड पोलिसांकरिता आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता विनामूल्य टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
टेलिमेडिसिन समुपदेशन ही आजच्या काळातील लोकप्रिय अशी सुविधा आहे. ज्याद्वारे रुग्णांना कॉल अथवा व्हिडीओ कॉलींगद्वारे डॉक्टरांशी थेट संवाद साधता येतो. FIGMD प्रायव्हेट लिमिटेड ही अमेरिकेतील एक अग्रणी अशी संस्था आहे, जी रुग्णांना मोबाईल ॲपद्वारे अथवा हेल्पलाईन क्रमांकाद्वारे टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा पुरविते. ज्यात अमेरिकेतील तब्बल 60 टक्के डॉक्टर्स जोडले गेले आहेत. भारतातही त्यांच्यामार्फत तशी सुविधा सुरु करण्यात आली आहे, आणि करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची प्राथमिक लक्षणे आढळल्यास रायगड पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेकरिता विनामूल्य टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा 24/7 तास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत आरोग्य तपासणीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर 45 मिनिटांच्या आत एका समन्वयकाद्वारे संपर्क साधला जातो. ज्यात आपल्या सोयीनुसार तपासणीची वेळ ठरविण्यात येईल, ठरविलेल्या वेळेनुसार कॉल अथवा व्हिडीओ कॉलिंगद्वारे डॉक्टर आपल्याशी संपर्क साधतात. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ठरलेल्या वेळेनुसार संबंधित आजारावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन केले जाते. आपल्या समस्येचे निराकरण करुन आवश्यकतेप्रमाणे डॉक्टरांकडून प्रिस्कीप्शन मिळते. जर रुग्णाला प्रत्यक्ष वैद्यकीय मदत किंवा प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक असेल तर रुग्णाला जवळच्या रुग्णालयाला भेट देण्यास सुचविले जाते.
FIGMD प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे सामाजिक जाणिवेतून पुरविण्यात आलेली ही सुविधा पोलिसांकरिता तसेच त्यांच्या कुटूंबियांकरिता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशा प्रकारच्या सुविधा राबविल्यामुळे लॉकडाऊन काळात घरातून बाहेर न पडण्याचा हेतूही साध्य होत आहे.