लोकशाहीप्रधान आपल्या भारतात जनता लोकप्रतिनिधीची निवड करीत असते आणि निवडून आलेला नेता जनतेचे नेतृत्व करतो. नेत्याकडून सर्वसाधारपणे जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि परिसराचा विकास अपेक्षित असतो, मात्र अनेक नेत्यांना निवडून आल्यानंतर कर्तव्याचा विसर पडतो. पनवेलचे कार्यतत्पर व सेवाव्रती आमदार प्रशांत ठाकूर त्याला अपवाद आहेत. त्यांनी अखंड जनसेवेचा वसा घेतला असून तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहे.
महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठ्या असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर प्रतिनिधित्व करतात. मुंबईच्या जवळ असलेल्या आणि कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. नागरिकांचा रेटा वाढत असल्याने साहजिकच व्यवस्थेवर ताण येतो. हे लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे पनवेल नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. या महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. प्राथमिक अवस्थेतील महापालिकेची पहिली पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पालिका दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करीत असताना राज्यात नवे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता अधिक जोमाने विकास होईल हे वेगळे सांगायला नको.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सत्ताधारी आणि देशातील सर्वांत मोठ्या भारतीय जनता पक्षाची रायगड जिल्हा अध्यक्षपदाचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे पनवेलसह जिल्हाभरातील लोक तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्याकडे निरनिराळ्या कामांच्या निमित्ताने येत असतात. एवढा व्याप असूनदेखील ते न थकता रात्रंदिवस कार्यरत असतात. एवढी ऊर्जा ते कोठून आणतात, त्यांनाच ठाऊक. अविश्रांत परिश्रम काय असतात हे त्यांची कार्यशैली पाहिल्यावर मनोमन पटते.
आमदार प्रशांत ठाकूर हे सरळमार्गी, स्पष्टवक्ते स्वभावाचे आहेत. जे काही करायचे ते प्रामाणिकपणे आणि शिस्तीने असा त्यांचा खाक्या आहे. हेच गुण त्यांना यशस्वी करतात. गत विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. यावरून त्यांच्या उत्तुंग कार्याची आणि प्रचंड लोकप्रियतेची प्रचिती येते. वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजकारणाचा वारसा ते समर्थपणे पुढे नेत आहेत.
व्यापक दृष्टिकोन आणि दूरदृष्टीने आमदार प्रशांत ठाकूर यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या डोक्यात कामांचे नियोजन ठरलेले असते. आपल्या पनवेल मतदारसंघातील शहरी, सिडको वसाहती आणि ग्रामीण भागातील विकासाचा मेळ ते योग्य प्रकारे घालतात. त्यांच्या आमदार निधीतून तसेच प्रयत्न व पाठपुराव्यातून शासनाच्या विविध फंडांतून मतदारसंघात सातत्याने आवश्यकतेनुसार विकासकामे सुरू असतात. जनतेप्रती इतकी बांधिलकी असलेला लोकप्रतिनिधी विरळाच.
समाजकारणाबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा वावर असतो. त्यांचे आणखी एक गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांना सतत नाविन्याचा ध्यास असतो. नवनवीन गोष्टी शिकण्यात, आत्मसात करण्यात त्यांना आनंद मिळतो. शिवाय पुस्तके वाचून ते विविध विषयांचे रसग्रहण करतात. असे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व आहे.
अभ्यासू, संयमी, निगर्वी, निष्कलंक आणि लोकाभिमुख नेतृत्व असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांची कारकीर्द उत्तरोत्तर अशीच बहरत राहो आणि त्यांना निरोगी व दीर्घायुष्य मिळो या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
-समाधान पाटील,