मुंबई दि.27: आज मंगळवार २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात सुपरमून दिसणार आहे. त्यामुळे आज चैत्र पौर्णिमेचे चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. महिन्यातून तो एकदा पृथ्वीजवळ येतो व एकदा दूर जातो. आज चंद्र पृथ्वीच्याजवळ ३ लक्ष ७३ हजार ३७९ किलोमीटर अंतरावर येणार आहे . आज चैत्रपौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीजवळ आल्यामुळे सुपरमून दिसणार आहे. आज रात्री ७ वाजून २३ मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळेल. साध्या डोळ्यांनी सुपरमूनचे दर्शन घेता येईल. यानंतर यावर्षी वैशाख पौर्णिमेच्या रात्री २६ मे रोजीही सुपरमून दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.