मुंबई, दि. 20 : गोल्डन अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळते. त्याचप्रमाणे राज्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराकरिता गोल्डन अवर सुरु झाला असून त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच संपवायचा आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. आज राज्यशासनाने जाहीर केलेल्या बंदी आदेशाबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची लागण टाळण्याकरिता संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्याकरिता राज्यशासनाने जनतेच्या हितासाठी काही पावले उचलली आहेत. स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक बाबी, पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, औषध दुकाने, किराणा दुकान, भाजीपाला आदी सुरु राहील, याची खबरदारी घ्यावी. हे करत असतानाच नागरिकांनी व्यापक जनहिताकरिता घरीच थांबावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून पुढचे टप्पे टाळण्याकरिता काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. मात्र त्याचा फायदा हा राज्याला होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुढचे दहा ते पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कायदा वापरताना त्याचा जुलुम होणार नाही याचही दक्षता घ्यावी. रुग्णालयांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेतानांच ज्यांच्या नियोजित शस्त्रक्रिया आहेत ज्या पुढे ढकलता येवू शकतात, अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात. प्राथमिक तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना एन 95 मास्क द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदतीला काही सामाजिक संस्था, खासगी संस्था, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक पुढे येत आहेत. एप्रिल-मे च्या काळात राज्यात रक्ताची उपलब्धता कमी प्रमाणात असते. अशा परिस्थितीत पुरेसा रक्तसाठा असावा याकरिता कमीत कमी संख्या असलेले रक्तदान शिबीर घ्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!