पनवेल दि.२०: शिक्षणाचा पाया मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने जी-२० समिट च्या अंतर्गत रन फॉर एज्युकेशन ही रॅली संपूर्ण देशात काढली जात आहे. त्याला इंग्रजीमध्ये एफएलएन असे म्हटले जाते. याचा पाया जर मजबूत झाला, तर भारतातील शिक्षण व्यवस्था मजबूत होईल हा नवीन शैक्षणिक धोरणाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताला दिलेला आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांनी आज खारघर येथे केले.
भारताच्या जी-२० समिट अध्यक्षपदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागांत एफएलएन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक हब असलेल्या खारघरमध्ये मुंबई विभागाच्या ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. खारघर सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपासून सुरू झालेल्या या भव्य रॅलीचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या रॅलीला शाळा, विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, माजी नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, निलेश बावीस्कर, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिक्षण विभागाचे विभागीय उप संचालक संतोष सांगवे, मनीषा पवार, रायगड प्राथमिक विभागाच्या अधिकारी पुनीता गुरव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जी-२० समिट च्या अनुषंगाने लोक सहभागातून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली “वसुधैव कुटुंबकम” या ब्रीदवाक्यास अनुसरून Foundational Literacy & Numeracy (FLN) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, संपूर्ण समुदाय आणि लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल येथून या रॅलीला सुरुवात झाली. पुढे विश्वज्योत सजल, ग्रीन हेरिटेज बिल्डिंग, जलवायू विहार बस स्टॉप, शिल्प चौक, बँक ऑफ बरोडा, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, बिकानेर स्वीट्स, त्यानंतर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत विविध शाळेतील दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयी विविध फलक संदेशाद्वारे जनजागृती करण्यात आली.