पनवेल,दि.७: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्यावतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महिला स्वच्छता दुत आणि आशा सेविकांना साडी व मानचिन्ह देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वित्तीय सल्लागार दिपा राऊत, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका, प्रभाग समिती सभापती,आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, पालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वित्तीय सल्लागार दिपा राऊत यांनी महिलांना आर्थिक बचतीचे नियोजन करून आर्थिक दृष्ट्या महिलांनी सक्षम होणे गरजेचे असल्याचे सांगितले, तसेच हे नियोजन करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल यांनी महिला स्वच्छता दुत व आशा सेविका यांनी दोन वर्षे कोविड काळात केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांच्या कामास मानाचा मुजरा करत असल्याचे सांगितले.
आयुक्त गणेश देशमुख यांनी कोविड काळात महिला स्वच्छता दुत आणि आशा सेविकांनी केलेले काम महापालिकेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा खास सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.
कोविड काळात महिला स्वच्छता दुत आणि आशा सेविका या कोविड योध्दांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे या आयुक्त देशमुख यांच्या संकल्पनेला महिला बालकल्याण विभागाने प्रत्यक्ष रूप दिले. या महिला स्वच्छता दुत आणि आशा सेविकांना विशेष सन्मानित करण्यासाठी प्रभाग अ,ब,क येथून आणण्यासाठी खास बसेसची सोय करण्यात आली होती. तसेच सर्वांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे आभार महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांनी मानले.