अलिबाग,दि.16: जिल्ह्यातील कातकरी समाजातील श्री समर्थ पुरूष बचतगट, श्रीगाण या बचतगटाने मेजर ध्यानचंद स्टेडीयम, दिल्ली येथे आयोजित आदि महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्टॉलला भेट दिली आणि बचतगटाचे अध्यक्ष दत्ता नाईक यांच्या वारली पेंटींग व कलाकुसरीचे दिलखुलास कौतुक केले. तसेच दिल्लीमधील नागरिकांनीही या स्टॉलला मोठ्या प्रमाणावर भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण,जि.रायगड यांच्यामार्फत श्री समर्थ पुरूष बचतगट, श्रीगाण या बचतगटास वारली पेंटिंग करून विविध वस्तू निर्मिती करण्यासाठी न्यूक्लिअर बजेट योजनेंतर्गत रू. 3 लाख अनुदान मंजूर करण्यात आले होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट झाल्याने याप्रसंगी दत्ता नाईक यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा अविस्मरणीय क्षण अनुभवयास आल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या योजनांमध्ये भाग घेण्यासाठी प्रकल्प अधिकारी शशीकला अहिरराव यांनी आदिवासी समाजातील लोकांना आवाहन केले आहे.