पनवेल दि.०२: महापालिकेचे नियमित चालणारे काम प्रचंड असते त्यातच हे करोनाचे संकट ओढवल्याने खूप मोठी जबाबदारी पालिकेवर येऊन पडली. पनवेल महापालिकेची स्थापना होऊन थोडाच काळ झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने कामाचे नियोजन करणे अवघड होत होते. असे असताना देखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गांभीर्याने करोना काळात आघाडीच्या सैन्यफळीसारखे लढायला लागले. त्यातच प्रामुख्याने नव्याने रूजू झालेल्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनीही कामाला जोमाने सुरुवात केली. याआधीचा कल्याण–डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय अनुभव त्यांच्या गाठीशी होता, तो या ठिकाणी उपयोगी आला.
आयुक्तांच्या सूचना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष दिले. एका बाजूला नियम राबवायचे त्याचबरोबर नागरिकांत असंतोष पसरू नये, याची काळजी घ्यायची, अशा दुहेरी भूमिका त्यांना पार पाडाव्या लागत होत्या. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पूर्ण रायगड जिल्ह्याचा करोना रूग्णांचा भार पनवेल महापालिकेवर होता. त्यामुळे इथे घेतलेला निर्णय कोकणच्या एकूण आरोग्याशी निगडीत होता, हे ओळखून पनवेल महापालिकेने अत्यंत जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने कार्य केले.
सांडभोर यांनी त्या त्या स्तरावर महापालिकेतील सर्वच विभागांशी समन्वय साधून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रशासनाला एक टिम म्हणून अधिक गतिमान तर केलेच परंतु या टिमला प्रोत्साहित करण्याचे, त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम तृप्ती सांडभोर यांनी अगदी लीलया केले. रूग्णांचे संपर्क,चाचणी, ट्रेसिंग, डिस्चार्च यांच्या व्यवस्थापनावर त्यांनी विशेष भर दिला. करोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘वॉर रूम’ हेच त्यांचे कार्यालय आणि घर झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय यंत्रणा, पालिका आणि इतर विविध विभागांशी समन्वय साधण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. याचबरोबरीने रूग्णांची माहिती अद्ययावत करणारे सॉफ्टवेअर वापरून रूग्णांसाठी बेडस् चे उपलब्ध करण्याचे अतिशय क्लिष्ट काम त्यांनी हाताळले. त्यामुळे अधिकाधिक रूग्णांना सहज बेडस् उपलब्ध होऊ लागले, पर्यायाने रूग्णांचे होणारे कष्ट कमी झाले. करोना रूग्णसंख्येचे अचूक विश्लेषण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे काम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केले.
करोनाकाळात बाहेरुन आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक विलिगीकरण करण्याची मोठी जबाबदारी पनवेल महानगरपालिकेवर होती. पालिकेने इंडिया बुल्सची इमारत संस्थात्मक विलगीकरणासाठी घेतली होती. येथील रूग्णांना सोयी-सुविधा पुरविण्याची मोठी जबाबदारी श्रीमती सांडभोर यांनी पार पाडली. रुग्णांच्या बाबतीत कोणतीही हयगय होऊ नये, याची सर्वोतोपरी काळजी त्यांनी घेतली.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” लोकांमध्ये रूजण्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीचे नियोजन केले. त्याचा सातत्याने आढावा घेण्याचे काम श्रीमती सांडभोर यांनी केले. विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम त्यांनी केले. विशेषत: करोना पॉझीटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ज्या ठिकाणी जास्त आहे अशा इमारती सील करून करोनाची साखळी तोडण्यावर त्यांनी भर दिला. हे सगळे काम करताना स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला करोनाची लागण होऊनही कच न खाता, न डगमगता त्यातून बाहेर पडून त्यांनी अधिक उत्साहाने पुन्हा काम सुरू केले.
करोनाचा संसर्ग आटोक्यात येतानाच पनवेल शहरातील विकासकामे जलदगतीने सुरू करून पूर्ण करायचे लक्ष्य त्यांच्यासमोर होते. शासनाची अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हाताळले. महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे विविध प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी नियोजन करून कामाची गुणवत्ता आणि गती यातील योग्य मेळ त्या साधत आहेत. सामाजिक भान राखत महिला व बालकल्याण विभागाचे धोरण त्यांनी आखले आहे. अजूनही करोना नियंत्रणाबरोबरच आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका टीमला सोबत घेऊन इतर विकासकामे प्रगतीपथावर नेण्याचे श्रीमती सांडभोर यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
लेखन – वर्षा कुलकर्णी
(जनसंपर्क अधिकारी, पनवेल महानगरपालिका)