पनवेल दि.५: (समाधान पाटील) लोकशाही प्रणालीत जनतेमधून निवडून येणार्या लोकप्रतिनिधीला विशेष महत्त्व असते. निवडणुकीमध्ये मतदार स्वतःच्या मताची मोहोर उमटवून आपला नेता निवडत असतात. अर्थात, निवडलेल्या नेतृत्वाकडून नागरिकांना विकास, सोयी-सुविधा, अडल्या-नडल्यावेळी मदत यांसारख्या आशा, आकांक्षा, अपेक्षा असतात. फार थोडे नेते या कसोटीवर खरे उतरतात. यापैकीच एक आहेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर. जनता हेच कुटुंब मानून ते कार्यरत आहेत.
सर्वस्पर्शी नेतृत्व असलेल्या प्रशांत ठाकूर यांच्या आमदारकीची सध्या तिसरी टर्म सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजयाची हॅट्ट्रिक साधली. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, जिल्हा अध्यक्ष असा त्यांच्या यशाचा आलेख सतत चढता राहिलेला आहे. यामागचे रहस्य म्हणजे त्यांची मेहनत. सदैव कोणत्या ना कोणत्या कामात ते व्यस्त असतात. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो आणि रात्री उशिरा संपतो. यादरम्यान ते विविध पातळ्यांवर न थकता काम करीत असतात.
बर्याचदा असे पाहण्यात येते की राजकीय क्षेत्रातील मंडळी लोकप्रियता मिळाल्याने हुरळून जातात. पद, सत्तेची हवा तर कित्येकांच्या डोक्यात शिरते, पण गर्भश्रीमंती आणि यशाचा मिलाफ होऊनही आमदार प्रशांत ठाकूर यांचे पाय जमिनीवर आहेत. विशेष म्हणजे एवढे कार्य उभारूनदेखील अजून खूप काही करायचे अशा भावनेने ते कार्यरत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो. त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे ते निगर्वी, पण स्पष्टवक्ते आहेत. जे काही असेल ते थेट सांगतात. मुख्य म्हणजे जनहिताची कामे चिकाटीने पूर्ण करतात. कुणी नाराज होईल म्हणून न पूर्ण होणारे आश्वासन देत नाहीत आणि जर एखाद्याचे काम होत नसेल, तर त्याला पात्रतेनुसार योग्य पर्याय सुचवितात.
गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे सावट आहे. या काळात काय काय होऊन गेले ते सर्वांनीच पाहिले आहे. अशा बिकट परिस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. मास्क, सॅनिटायझर, गोळ्या-औषधांपासून अन्नधान्य-भोजनापर्यंत जे जे शक्य होईल त्याचे वाटप करून त्यांनी जनतेला दिलासा दिला. यंदाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो गरीब, गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय गतवर्षी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी प्रशांत ठाकूर यांनी आमदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी दिला, तर यंदा आमदार स्थानिक निधी कार्यक्रमातून एक कोटी सात लाख रुपयांचा निधी दिला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. ज्या ज्या वेळी जनतेवर एखादी आपत्ती ओढावते त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर जनतेसाठी धावून जातात. याचा प्रत्यय नुकताच पुन्हा एकदा आला. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणात अतिवृष्टी होऊन पूर आला, दरडी कोसळल्या. याचा सर्वाधिक फटका महाड तालुक्याला बसला. महाडमधील तळीये गावात दरड कोसळून 84 जण मृत्युमुखी पडले. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लागलीच भेट देऊन पाहणी केली आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला, तर महाड शहरात तळ ठोकून पूरग्रस्तांसाठी सेवाकार्य सुरू केले. या सेवाव्रती आमदाराने सर्वप्रथम आपद्ग्रस्तांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून महाडच्या गुरूकुल शाळेत भोजनाची व्यवस्था केली. यासाठी त्यांनी आधी पनवेलहून तयार अन्नाची पाकिटे, पाणी स्वतःहून पुरविले. त्यानंतर पनवेलमधील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नागरिकांनाही पूरग्रस्तांच्या मदतीकरिता योगदान देण्याचे आवाहन केले. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध झाली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसेवेचा वसा अंगिकारला आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या भगवद्गीतेतील श्लोकानुसार फळाची इच्छा न धरता ते कर्म करीत आहेत. हीच निष्काम सेवा त्यांना नेहमी यशस्वी करते. अशा या सेव्रावती नेत्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!