पनवेल दि.1: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती दिलेले समर्पित योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, साहित्य आणि समाजकारण यामध्ये आदरणीय अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाचे वास्तव, त्यांच्या व्यथा, वेदना, आपल्या अजरामर साहित्यातून अतिशय परिणामकारक पद्धतीने जगासमोर मांडल्या आहेत. शिवाय श्रमिकांसाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याची दखल थेट रशियाने घेतली आहे. महाराष्ट्राच्या मातीत एका मागास कुटुंबात जन्मलेल्या या महानायकाचा मॉस्कोमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे. 
अण्णाभाऊ यांनी निरक्षर असतानाही साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील दीन, दुर्बल, पिडीत श्रमिक लोकांच्या समस्यांना प्रकाशात आणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्ती संग्राम दरम्यान त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून लोकजागृतीचे काम केले. त्यांनी मराठी भाषेत लिहिलेल्या ३५ कादंबरीचे विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे तसेच ७ कादंबरीच्या आधारावर चित्रपटांची निर्मितीही झाली आहे. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यांनंतरच्या काळात राज्यातील विविध राजकीय व सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि यानिमित्त महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या सहयोगातून टपाल तिकीट सुरु केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाजप्रती असलेले महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या समर्पित जीवनाचा गौरव करावा, अशी सर्व महाराष्ट्रातील जनतेची आपणांकडे मागणी आहे., असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!