पनवेल दि.21: पनवेल महानगरपालिकेची महासभा आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पनवेल, कळंबोली, खारघर, येथील उद्याने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिडको कडून हस्तांतरण झालेल्या भूखंडावर उद्याने आणि मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटींची विकास कामे करण्याबाबत चर्चा करून त्यांना मंजूरी देण्यात आली. सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी तसेच नगरसेवक निलेश बाविस्कर,आरती नवघरे, प्रवीण पाटील, मनोज भूजबळ, एकनाथ जाधव, चारूशिला घरत, सीताताई पाटील, डॉ. अरूणकुमार भगत, हरेश केणी, अनिता पाटील अरविंद म्हात्रे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली विभागातील सेक्टर 6ई , प्लॉट क्रमांक 2 मधील उद्यान भूखंडाचा विकास आय.जी.पी.एल कंपनीच्या सीईआर फंडातून करण्याबाबत जे पत्र मिळाले आहे, या पत्राचा विचार करून निर्णय घेण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला.
या महासभेत महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ मधील विविध गावांमध्ये विकास कामे करण्याचा विषय मंजूर करण्यात आला तसेच पडघे गावामध्ये बौध्दवाडा येथे समाजमंदिर बांधून मिळणेबाबतचा विषय मंजूर करण्यात आला
प्रभाग समिती ‘अ’ खारघर गावांमधील एकत्रित मुलभूत सुविधांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाण्याची टाकी, पाईपलाईन अशी पाणीपुरवठा विषयक कामे तसेच मलनिस्सारण, रस्ते, पावसाळी गटार, विद्युत वाहिन्या भूमिगत करणे अशा 11 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येविषयी नगरसेवकांना अवगत करून, नागरिकांना कोराना विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याची विनंती केली. तसेच गर्दीवर नियंत्रण राखणे, आणि मास्क,सॅनिटायझर, सामाजिक अंतर या कोरोनाच्या त्रिसूत्री नागरिकांनी पाळावी यासाठी नगरसेवकांनी आवाहन करावे अशी विनंती केली.