श्रीवर्धन शहरातील न्यायालयाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न
अलिबाग,दि.23: काळानुरूप न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा वापर गरजेचा आहे. न्यायव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ई-प्रणाली न्यायदानात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद साठये यांनी आज श्रीवर्धन येथे केले.
श्रीवर्धन शहरातील गणेश आळीत न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या हस्ते सपत्नीक दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीवर्धन नगरपरिषदेच्या समोरील कुलकर्णी सभागृहात आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती मिलिंद साठये बोलत होते.
यावेळी श्रीवर्धन आमदार आदिती तटकरे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, ज्येष्ठ विधीतज्ञ विनोद घायाळ, ॲड. आशिष वढावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील अभियंता व इतर अधिकारी-कर्मचारी, रायगड जिल्ह्यातील विविध तालुका न्यायालयांचे न्यायाधीश,वकील संघटनांचे तालुका अध्यक्ष, न्यायालयात कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.
न्यायमूर्ती साठ्ये पुढे म्हणाले, आजचा दिवस आपणा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भौतिक सुविधांचा अभाव असताना या परिस्थितीमध्ये अतिशय उत्तमपणे न्यायदानाचे काम अतिशय पद्धतशीरपणे पार पडत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. शेवटी आगामी काळामध्ये सर्वसामान्यांसाठी न्यायदान प्रक्रिया सोपी होण्याच्या दृष्टीकोनातून ई-फाईलिंगबाबतही त्यांनी महत्वपूर्ण भाष्य केले.
न्यायमूर्तींनी सभागृहामध्ये रेखाटलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकृतीच्या रांगोळीचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांच्या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.
रायगड जिल्हा न्यायाधीश शैलजा सावंत यांनी श्रीवर्धन न्यायालयाच्या पूर्व इतिहासाची माहिती उपस्थित सर्वांना दिली तसेच न्यायालयाची इमारत माझ्या कार्यकाळात होत आहे, याबाबत आनंद व्यक्त केला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!