महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शनासाठी पनवेल भाजपा कडून महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
पनवेल दि.३: राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देत सरकारचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक योजना अंमलात आणत देशाला सक्षम केले त्याचप्रमाणे आता तिसऱ्या पर्वातही काम सुरु आहे. त्याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत आहे. राज्याचे वित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पातून महिला, ज्येष्ठ, युवा, शेतकरी, दुर्बल घटकांसाठी विविध योजना सादर करतानाच पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्वाच्या योजना मांडत राज्याच्या विकासावर भर दिला असून या महत्वपूर्ण अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले कि, महिलांसाठी विविध योजना आखत महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून होत आहे.अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकारच्या वतीने महिना १ हजार ५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार असून योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, महिलांना या योजनेची सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी येत्या रविवारपासून पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात वारकरी बांधवांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव, पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखण्यात आल्या असून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’अंतर्गत २ हजार ६९४ शेतकरी कुटुंबांना ५२ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान वाटप, कांदा उत्पादकांसाठी फिरता निधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, २०२४ पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प, अटल बांबू समृद्धी योजनेतून १० हजार हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूची लागवड प्रतिरोपासाठी १७५ रुपये अनुदान, त्याचबरोबर युवा वर्गासाठी विविध योजनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना- दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ – प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण, जागतिक बैंक सहाय्यित २ हजार ३०७ कोटी रुपये किमतीचा ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास’ – ५०० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल आय. टी. आय., जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे, येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित, ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन १५ ते ४५ वयोगटातील १८ हजार ९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण, संशोधन व नवउपक्रम केंद्रांसाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी, महापे, नवी मुंबई येथे २५ एकर जागेवर ‘इंडिया जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्क’ नियोजित २ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांचा समावेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र आणि त्या अनुषंगाने ८०० स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबरीने पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना अंतर्गत मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये एकूण ४४९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्यास मान्यता १२७ किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. या वर्षात आणखी ३७ किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार, शिवडी-वरळी जोडरस्त्याचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्यात येणार, ठाणे किनारी मार्ग- लांबी १३.४५ किलोमीटर ३ हजार ३६४ कोटी रुपये किमतीचे काम, १९ महानगरपालिकांमध्ये पीएम ई-बस सेवा योजना राबविण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार असून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’ मधून गरीब कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. राज्यात गाव तिथे गोदाम, तसेच कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०० रुपये देण्यात येणार आहेत. गाईच्या दुधासाठी ५ रुपयाचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे १ जुलैपासून हे अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर आशा वर्कर, कोतवाल, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात भरीव वाढ या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात आली असून सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प अजितदादांनी सादर केला आहे. शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक अशा सर्व महत्त्वाच्या घटकांना दिलासा देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान मोदींच्या गरीब कल्याणाच्या धोरणाला पुढे नेणारा, निर्धाराला पुढे नेणारा, महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.