रत्नागिरी दि.27(सुनिल नलावडे) कोकणात रानटी प्राण्यांच्या शिकारीवर आळा घालण्यास वनखात्याला बरेच मोठे यश आल्याच्या पार्श्वभुमीवर आज पुन्हा डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये बिबटया अडकला. पहाटे गावकऱ्यांना हे लक्षात येताच सर्वांची भंबेरी उडाली.
रत्नागिरी जवळच्या नेवरे गावात हा प्रकार घडला असुन वनखात्याच्या अधीकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन लोखंडी फासकी कटरच्या सहाय्याने कापून अखेर बिबटयाची मुक्तता केली.
बिबटया अडकल्याचा प्रकार मध्यरात्री उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कळवण्यात आला. त्यांनी पाली येथुनच वनअधीकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केल्याने वनखाते तत्परतेने घटनास्थळी पिंजऱ्यासह दाखल झाले.
सदरचे रेस्कू ऑपरेशन हे विभागीय वन अधीकारी दिपक पोपटराव खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, परिक्षेत्र वन अधीकारी रत्नागिरी प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल पाली गौ.पि.कांबळे, वनरक्षक जाकादेवी म.ग.पाटील, वनरक्षक रत्नागिरी मि.म.कुबल, वनरक्षक कोर्ले, सा.रं.पताडे यांनी पार पाडली.