पनवेल दि.१९: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावत विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे फक्त कोकणालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह अशी कामगिरी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने केली आहे. त्याबद्दल भारत सरकार व युनिसेफच्यावतीने ‘स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार २०२१-२२’ या पुरस्काराने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्लीतील संसद मार्गाजवळील आकाशवाणी रंग भवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग, केंद्रीय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, सहसचिव अर्चना अवस्थी- शर्मा व प्राची पांडे उपस्थित होते. सन्मानपत्र आणि ६० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभात हा सन्मान रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, शिक्षिका जसविंदर कौर, अनिता मिश्रा, ईफ्फत काटे, हेड बॉय मास्टर आदेश परेश ठाकूर, स्पोर्ट्स कॅप्टन अथर्व सांडगे, स्कुल व्यवस्थापन प्रतिनिधी अ‍ॅड.विनायक कोळी यांनी स्वीकारला.
भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी शाळांचे नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून १ लाख ०३ हजार शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन केले होते. त्या मधून जिल्हा व राज्य पातळीवर सर्वेक्षण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर या शाळेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार २०२१-२२’ मध्ये ०८ लाख २३ हजार विद्यालयांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावर एकूण ३९ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने अव्वल कामगिरी करत ‘राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१ – २२’ सन्मान प्राप्त केला. दरम्यान या पुरस्काराच्या पार्श्वभुमीवर भारत सरकार आणि युनिसेफच्या वतीने फोटोग्राफरची टीम रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आली होती. त्यांनी ६ तासांहून अधिक वेळ शाळेची शूटींग आणि फोटो काढले होते. त्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली डॉक्युमेट्रीचे केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते रिमोटद्वारे प्रकाशन आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी करण्यात आले. आणि ती जगभरात प्रसिद्ध करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!