अलिबाग,दि.20 : रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.पावसामुळे आंबेनळी घाटातून दरड कोसळली असून, पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे.जिल्ह्यातील बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसामुळे सावित्री, पाताळगंगा, अंबा नद्यांना पूर आला आहे.या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.त्यामुळे या नदी किनाऱ्याजवळील महाड, रसायनी, आपटा, नागोठणे, रोहा, चिरनेर परिसरातील सखल भागात पाणी जमा झाले आहे.
पावसामुळे आंबेनळी घाटातून दरड कोसळली असून, पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे.नेरळ कळंब रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाने आज आणि उद्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.