अलिबाग,दि.24- जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील खाजगी असलेल्या रायगड हॉस्पिटलचे रूपांतर लवकरच काेविड उपचार रुग्णालयात होवू शकते.
त्या दृष्टीने बुधवार,दि.22 जुलै रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटरला भेट दिल्यानंतर जिल्ह्यातील 450 बेडचे हे खाजगी हॉस्पिटल शासकीय कोविड रूग्णालय म्हणून रूपांतरित करण्यास जिल्हा प्रशासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन केले.
दि.22 जुलै रोजी खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यादरम्यान कर्जत तालुक्यासही भेट दिली. त्यावेळी त्यांनी रायगड हॉस्पिटलमध्ये जाऊन करोना पॉझिटिव्ह रुग्णांची आस्थेने चौकशी केली व नंतर रायगड हॉस्पिटलचीही पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसिलदार विक्रम देशमुख, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.के.मोरे, कर्जत उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे आदी प्रमुख अधिकारी तसेच महसूल आणि आरोग्य विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह परंतु ज्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांसाठी कोविड केअर रुग्णालय सुरू करण्यासाठी कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल सज्ज झाले आहे. लक्षणे नसलेल्या परंतु करोना पॉझिटिव्ह अशा रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष येथे उभारण्यात आला आहे. खासगी स्वरूपात 450 बेड उपलब्ध असलेल्या या प्रशस्त रुग्णालयाचे प्रशासनाकडून कोविड रुग्णालयात रूपांतर केले जावू शकते, असे सांगून रायगड हॉस्पिटलमध्ये यापूर्वीच शासनाच्या वतीने 100 बेड चे कोविड केअर सेंटर सुरू अाहे. मात्र खासगी रायगड हॉस्पिटलचे संपूर्ण कोविड उपचार रुग्णालयात रूपांतर ही बाब रायगड जिल्ह्यातील स्वतंत्र अशा कोविड रुग्णालयाच्या दृष्टीने महत्त्वाची असून यामुळे भविष्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांना शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये नेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे भविष्यातील 450 बेडच्या कोविड रूग्णालयासाठी आवश्यक असणारे पुरेसे मनुष्यबळ, डॉक्टर्स, नर्सेसची तसेच आवश्यक ऑक्सिजनची व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध झाल्यास या खाजगी हॉस्पिटलचे शासनाच्या कोविड उपचार रूग्णालयात रूपांतर करण्यात येईल व अशा प्रकारचे 450 बेडचे हे पहिलेच रूग्णालय असेल, त्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णांना होईल, त्या रुग्णांना अन्य मोठ्या शहरात उपचारासाठी पाठविण्याची गरज पडणार नाही, असा विश्वासही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!