पनवेल दि.३: छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पनवेल भाजपच्यावतीने आज आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
अजित पवार यांच्या या चुकीच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले असून भाजपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नसणे, ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपकडून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तीनही धर्माचे रक्षण केले. त्यांना औरंगजेब धर्मांतर करायला असे म्हणत होता, पण त्यांनी ते कधीच मान्य केले नाही. धर्मवीर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे केले तरी त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. अजित पवार आणि त्यांच्यासारख्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होतेच पण ते धर्मवीर देखील होते हे लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर सीताताई पाटील, चारुशीला घरत, भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मुकीत काझी, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत,राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, नीता माळी, ज्योती देशमाने, अंजली इनामदार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.