अलिबाग, दि.२८: भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या वतीने देशभरात “आझादी का अमृतमहोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासकीय यंत्रणांनी लाभार्थींवर लक्ष केंद्रित करून कोणताही नागरिक मागे राहू नये यासाठी त्यांच्या विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण करण्यात येत आहेत.
यानुषंगाने दि.31 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिमला, हिमाचल प्रदेश येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हास्तरावर पंचायत राज संस्था (PRI), स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसह निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
दि.31 मे 2022 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी राज्य व जिल्हा दूरदृष्यप्रणालीद्वारे (Online) जोडले जाणार असून या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, महापौर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, इतर लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. संवादाचा पहिला भाग राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल आणि सकाळी 10:50 वाजता समारोप होणार आहे. या प्रसंगी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरित केला जाणार आहे, यासाठी कृषी विज्ञान केंद्रांमध्ये (KVK) समांतर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य आणि जिल्हा स्तरावरील कार्यक्रम शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाणार असून पंतप्रधान मोदी हे निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चॅनेलवर केले जाणार असून युट्यूब आणि NIC चॅनलद्वारे वेबकास्ट देखील केले जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!