नागपूर, दि.10 : भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा ही अत्यंत महत्त्वाची असून, प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच व्हायला हवे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठातर्फे सुरेश भट सभागृहात त्रिदिवसीय अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, परिषदेचे आयोजक आणि विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, अखिल भारतीय प्राच्याविद्या परिषदेचे अध्यक्ष प्रा. गौतम पटेल, कार्यकारी सचिव प्रा. सरोजा भाटे, स्थानिक सचिव प्रा. मधुसूदन पेन्ना आणि कुलसचिव प्र. सी. जी. विजयकुमार यावेळी उपस्थित होते. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून, विविध भाषेची सुरुवात संस्कृत या भाषेपासून झाली आहे. इतिहासाचे अध्ययन करण्यासाठी प्राच्यविद्येचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, वैयक्तिक जीवनात तसेच प्रशासनिक कार्यामध्ये स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. मातृभाषेतून भावभावना, संकल्पना, व्याख्या आदी सहज स्पष्ट होतात. त्यामुळे मराठी भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे असल्यामुळे राज्यांनीही केवळ मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे, असे आवाहनही उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. बौद्ध, पाली, पारसी, अरबी भाषांचे अध्ययनही अनेक भाषांमधून करण्यात आले आहे. या भाषा, अध्ययनाचे दस्तावेज उपलब्ध आहेत. यावेळी संस्कृतसह प्राच्यविद्या अध्ययन व संशोधनाच्या विविध संस्थांचा पुण्यातील भांडारकर प्रतिष्ठाण यासह इतरही भाषासंस्थाचा आवर्जून उल्लेख केला. भाषा आणि भावना सोबत असल्यास त्या सहज व्यक्त करता येतात. तसेच त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही सहज वहन करता येतात. भारत हा बहुविध भाषा असलेला मोठा देश असून, येथे 121 भाषांमध्ये स्थानिकांकडून संवाद साधला जातो, असे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय प्राच्याविद्या परिषदेचे अध्यक्ष प्रा. गौतम पटेल यांनी प्राच्यविद्या परिषदेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. यावेळी 111 पुस्तकांचे डिजिटल प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या शंभर वर्षपूर्तीचा माहिती देणारा हिस्टरी ऑफ ए.आय.ओ.सी. हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच प्राच्यविद्या परिषदेच्या शंभर वर्षपूर्ती ग्रंथाचे विमोचन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!