प्राथमिक फेरीत वैयक्तिक गटात 63 स्पर्धक, तर सांघिक गटात नऊ स्पर्धक संघानी घेतला सहभाग
पनवेल दि.९: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत उत्तर रायगड जिल्हा स्पर्धा आज पनवेलमध्ये झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ही स्पर्धा होत असून, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली रायगड जिल्हा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश होता. या प्राथमिक फेरीतील विजेत्या स्पर्धकांना 19 फेब्रुवारीला सातारा येथील अजिंक्यतारा गड येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धक म्हणून संधी मिळणार आहे.
खांदा कॉलनी येथे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन स्पर्धकांचे कौतुक केले.
रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी सातारा येथे होणार्‍या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करावी म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीतील वैयक्तिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास सात हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये तसेच सांघिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्या संघास 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास सात हजार 500 रुपये, तर तृतीय क्रमांकांस पाच हजार 100 रुपये आणि प्रत्येक विजेत्यास स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे सहसंयोजक संचित यादव, सुनील सिन्हा, कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य, कोकण विभागीय सहसंयोजक दीपक पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, अमोल खेर, साईचंद्र निकाळजे, अथर्व गोखले, निखिल गोरे, श्वेता कुलकर्णी, यामिनी दामले आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील वैयक्तिक गटात 63 स्पर्धकांनी, तर सांघिक गटात नऊ स्पर्धक संघानी सहभाग घेतला. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी एकाहून एक सरस सादरीकरण केले. या वेळी भरतमुनी जयंतीनिमित्त मुग्धा दातार यांचे व्याख्यान झाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!