पनवेल दि.1: पनवेल महानगरपालिकेची स्थायी समिती सभा आज सकाळी ११.३० वाजता महापालिका भवनातील दुसऱ्या मजल्यावरील आयुक्त यांच्या दालना समोरील सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती.
पालिका क्षेत्रातील खारघर नोडमधील प्लॉट क्र.२२, सेक्टर नं.०५ येथील आयुक्त निवासस्थान बाहेरील परिसर विकसीत करणे व परिसरात लँडस्केपींग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने बांधण्यात आलेले १२ सार्वजनिक शौचालय पे अॅण्ड युज तत्वावर देण्याबाबत देखील बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
यावेळी बैठकीदरम्यान परवाना विभागाकडील व्यवसाय परवाने, हॉटेल व्यवसाय परवाने, नवीन कारखाने व उद्योंगधंदे यांचे सर्वेक्षण, नोंदणीकरण, नूतनीकरण, दुकानावरील जाहिराती (Glow Sing Board) व परवाना संबंधीच्या अनुषंगिक काम स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) पद्धतीने करुन नवीन व्यवसाय परवाने देणे व नुतनीकरण याबाबत देखील चर्चा करण्यात आली असून पुढील सभेत त्याविषयी निर्णय घेतला जाईल. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ब, प्रभाग क्र. ७ मधील रोडपाली स्मशानभुमी दुरुस्ती करणे,
पालिका क्षेत्रातील जाहिरात धोरणेच्याकामी मे.अलवेज अॅडव्हर्टाझिंग एजन्सी वाशी,नवी मुंबई यांना मुदतवाढ देण्यास मान्यता मिळण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.
तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील १ भूस्तर साठवण टाकी व १८ जलकुंभांची दुरुस्ती करण्याबाबत देखील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती नगरसेवक संतोष शेट्टी, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे महिला बालकल्याण समिती अध्यक्ष मोनिका महानवर यांच्यासह स्थायी समिती सदस्य, महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, इतर अधिकारी उपस्थित होते.
