पनवेल दि. 20: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आता लाॅकडाऊन क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
कोविड-19 विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी दिनांक 02.07.2020 रोजी लाॅकडाऊन आदेशानुसार दि. 03.07.2020 रोजी सायंकाळी 9 ते दि. 14.07 2020 रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तद्नंतर लाॅकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणा-या दुकानांवर निर्बंध लादण्यात आले होते. पुन्हा हे लाॅकडाऊन दि.24.07.2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आले होते.
पनवेल महानरपालिका कार्यक्षेत्रातील क्लस्टर कंटेन्मेंट झोन व इतर कंटेन्मेंट क्षेत्रामधील COVID-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता, या कंटेन्मेंट क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन सुरु ठेवणे आवश्यक असल्याने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज मनपाच्या इतर क्षेत्रातील लाॅकडाऊन उठविण्याचे आदेश जारी केले. सदरचे आदेश दि. 22 जुलै 2020 रोजी सकाळी 5 पासून लागू होतील.
आदेशातील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या क्लस्टर कंटेन्मेंट झोन व इतर कंटेन्मेंट झोन मध्ये दिनांक 31/07/2020 रोजी मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहील.
कंटेन्मेंट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे MISSION BEGIN AGAIN सुरु राहील. यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने सम-विषम (P-1 व P-2) तत्वावर चालविण्यास परवानगी असेल. (रस्त्याच्या एका बाजूला दुकाने, लेन, पॅसेज इत्यादी सम तारखांना उघडले जातील . तर दुस-या बाजूची दुकाने विषम तारखेला उघडली जातील.) सदरची दुकाने सकाळी 09.00 ते संध्याकाळी 05:00 या वेळेत उघडी राहतील. P-1 व P-2 हे संबंधित प्रभागाचे प्रभाग अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर ठरवतील. एपीएमसी मार्केट व मच्छी मार्केट मात्र बंद राहील.
कंटेन्मेंट क्षेत्रामध्ये या आधीच्या आयुक्तांच्या लाॅकडाऊन आदेशानुसार जाहीर केल्याप्रमाणे सर्व निर्बंध कडकपणे लागू राहतील.
या कालावधीतील लॉकडाऊनचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती /संस्था यांचेवर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता यामधील कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल असे उपायुक्त-जनसंपर्क जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
