ठाणे दि.३०: पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे तर खगोल गणित असते. मात्र ते आकाशाशी मिळते जुळते असायला हवे असे प्रतिपादन पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी केलं. सोमण यांच्या पंचांग गणित कार्याला ५१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सोमण यांनी लिहिलेल्या आठवणींची आकाशगंगा आणि सोमण नॅनो पंचांग २०२४ या पुस्तकांचे प्रकाशन ‘पीतांबरी”चे चेअरमन रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या पंचांगात चांद्र आणि सौर पध्दत आहे. त्यामुळे सण, उत्सव आणि ऋतू यांची सांगड घातली जाते. पंचांग म्हणजे खगोलशास्त्र आहे. त्यामुळे पंचांग हे केवळ देवघरात ठेवू नये असं सोमण यांनी सांगितलं. परदेशातून येऊन लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात त्यामुळे तुम्हीही या गोष्टींचा अभ्यास करायला हवा असं ते म्हणाले. वडीलांच्या निधनानंतर आपण पंचांग करायला सुरूवात केली पण आजचा सत्कार आपल्यासाठी खास असल्याचंही सोमण यांनी सांगितलं. लोक आपल्याला आनंदी आणि उत्साही असण्याचं रहस्य विचारतात. तर त्याचे कारण म्हणजे आपण वर्तमानात जगतो. नेहमी ब्राह्म मुहुर्तावर उठतो आणि त्यात कधीही खंड पडला नसल्याचं दा कृ सोमण यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला सोमण परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.