अलिबाग दि.11:- दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने “माझा गणेशोत्सव माझा मताधिकार” या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर “माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार” या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजाविणे, मतदारयादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर आपल्या देखाव्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov.in/ आणि समाजमाध्यमांवर सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी दि.31 ऑगस्ट 2022 ते 09 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे.
या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यासाठी प्रसार-प्रचार केला जावा आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!