पनवेल दि.०१: ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. तसेच हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.
या निमित्ताने पनवेलमध्ये दिव्यांगांच्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ३ डिसेम्बर रोजी बांठिया विद्यालय, नवीन पनवेल येथे करण्यात आले आहे. पनवेलच्या डॉ. नंदकुमार जाधव फाऊंडेशनच्या बौध्दिक अक्षम मुलांची विशेष शाळा आणि रायगड जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभागाने सयुक्त विद्यमाने क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. क्रिडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगांना प्रोत्साहन मिळावे याकरीत दिव्यांगाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १८ दिव्यांग शाळा सहभागी होणार असून ४ वयोगटांमध्ये ही स्पर्धां होणार आहे. ५० मीटर धावणे, स्पॉट जंप, सॉफ्ट बॉल थ्रो, १०० मिटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, आदी स्पर्धां होणार आहेत. स्पर्धेत २०० दिव्यांग विद्यार्थी आणि सुमारे १५० शिक्षक सहभागी होतील असा अंदाज आहे. रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धां होणार आहे.