कोविड प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही
अलिबाग,दि.12 : जिल्ह्यात करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क/रुमाल न वापरणे, सार्वजनिक रस्ता, बाजार,रुग्णालय, कार्यालयात थुंकणे या बाबींना आळा बसण्यासाठी दंडात्मक कारवाई म्हणून रुपये 500/- आणि सर्व दुकानदार,फळे,भाजीपाला विक्रेते तसेच जीवनावश्यक वस्तू विक्रेते यांनी मास्क लावला नसेल तर रुपये 200/-, दुकानात ग्राहक,व्यक्तींनी सामाजिक अंतर व साधारणत: 3 फूटाचे अंतर राखलेले नसल्यास दुकानदार मालक, विक्रेता व ग्राहकाला रुपये एक हजार दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले असून गावपातळीवर गटविकास अधिकारी व नगरपालिका क्षेत्रामध्ये आरोग्य/अतिक्रमण विभागप्रमुखांच्या अधिपत्याखाली दंड वसुली पथके कार्यरत होणार आहेत. वसुली पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागप्रमुखांकडून ओळखपत्रे दिली जातील.
त्याचबरोबर हळद, लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमास 50 पेक्षा अधिक माणसे असतील आणि मास्क लावला नसेल तर प्रत्येक व्यक्तीस रुपये 200 दंड आकारण्यात येईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम 188,269व 270 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 115 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत व कोविड प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.